बारामती : शारदानगर (ता. बारामती) येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात शुक्रवारी शेकडो विद्यार्थिनींनी रांगा लावून ‘यिन’चे प्रतिनिधी निवडण्यासाठी चुरशीने ऑनलाइन मतदान केले. 

‘यिन’च्या नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयात घेण्यात आलेल्या मतदानासाठी शुक्रवारी सकाळपासूनच शारदानगर येथे विद्यार्थिनींनी रांगा लावल्या. गेल्या वर्षी ‘यिन’च्या मंत्रिमंडळाचा शपथविधी शारदानगरमध्ये जल्लोषात झाला होता, तसेच ‘यिन’च्या माध्यमातून विविध उपक्रम पार पडल्यामुळे येथे विद्यार्थिनींचा मोठा जल्लोष होता. येथील संपूर्ण मतदानाची प्रक्रिया ऑनलाइन झाली. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी ही ऑनलाइन प्रक्रिया यशस्वी होण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. 

दुपारी चारपर्यंत येथे मतदानाची प्रक्रिया सुरू होती. ऊन असूनही मतदानासाठी विद्यार्थिनींचा उत्साह टिकून होता. मागील वर्षातील ‘यिन’चे विविध उपक्रम लक्षात घेऊन अनेक विद्यार्थिनींनी यंदाच्या निवडणुकीसाठी उभे राहण्याचा निर्णय घेतला. नेहा काटे, कुंती पाटील, प्रतीक्षा जगताप, रूपाली शिंदे या चार विद्यार्थिनी निवडणूक रिंगणात आहेत. 

‘यिन’ने नेतृत्व गुणाची संधी दिली 
आर. बी. देशमुख, (प्राचार्य, शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर) 

सकाळ माध्यम समूहाने सुरू केलेले ‘यिन’ व्यासपीठ युवक-युवतींच्या नेतृत्व विकास गुणांसाठी खूप मोठी संधी आहे. शारदानगरमध्ये गेल्या वर्षी ‘यिन’ मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला, तेव्हाच युवतींनी या व्यासपीठामध्ये सहभाग घेण्याची तयारी केली होती. त्यामुळे यंदा शारदानगरमध्ये मोठा उत्साह मुलींनी दाखविला. ऑनलाइन मतदानाची प्रक्रिया असतानाही त्यांनी दाखविलेला उत्साह व लावलेल्या रांगा या उपक्रमाविषयी विद्यार्थिनींमध्ये असलेली उत्सुकता सिद्ध करते.Source link

Leave a Reply